| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदर ते जासई ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावरील पथदिव्यांच्या झिंक मिक लाईटमुळे रात्रीच्या अंधारात वाहन चालकांच्या डोळ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जेएनपीए बंदर प्रशासन, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय), वाहतूक पोलीस शाखा व इतर संबंधित प्रशासनाने या विजेच्या समस्येकडे लक्ष केंद्रित केले नाही तर अपघात होऊ शकतो, अशी भीती वाहन चालक व्यक्त करत आहेत.

जेएनपीए बंदर प्रशासन, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उरणच्या सततच्या वाहतूक कोंडीवर तसेच वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची, उड्डाण पुलाची उभारणी केली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्रासपणे उड्डाण पुलावरील तसेच रस्त्यावरील पथदिव्यांखाली अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे भयानक चित्र समोर येत आहे. त्यात उरण-जेएनपीए बंदर ते जासई ग्रामपंचायत, पळस्पे फाटा या महामार्गावरील पथदिव्यांच्या झिंक मिक लाईटचा त्रास सध्या वाहन चालकांना रात्रीच्या अंधारात सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित प्रशासनाने या विजेच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी केली आहे.