2 ते 18 वयोगटातील मुलांचा समावेश
पेण | वार्ताहर |
पेण शहर व ग्रामीण भागातील गावागावात कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. यात आता 2 ते 18 वयोगटातील मुलांना बाधा झाली आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत असल्याने ताप, सर्दी, खोकला हे आजार डोके वर काढू लागले आहेत. गावात होणार्या कोरोनाच्या फैलावामुळे आता लहान मुलांना कोरोना संसर्गाची दुसर्या लाटेत बाधा झाली आहे. यात रावे 1, इरवाडी 1, बेनवले 1, वढाव 1, वडगाव 2, चिंचपाडा 2, फणसडोंगरी 2, आंबिवली 1 अशा 2 ते 18 वयोगटातील 6 मुले व 5 मुलींचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या 9317 असून, यातील अॅक्टिव्ह रुग्ण 633 आहेत. बरे झालेले 8452 रुग्ण आहेत. तर, मृत्यू पावलेले 232 रुग्ण आहेत. हा आकडा 20 जूनचा आहे. ग्रामीण भागातील उतरती रुग्णसंख्या पाहता, येणार्या महिन्यांचा पावसाळी हंगाम लहान मुलांसाठी अधिक काळजी व जबाबदारी घेऊन पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पेण उप जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश ताह्माणे यांच्याशी संपर्क करुन पेण तालुक्यात वाढत असणार्या लहान मुलांच्या कोरोना संसर्गाच्या प्रमाणाविषयी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले, की पेण उपजिल्हा रुग्णालयात राखीव बेड लहान मुलांसाठी ठेवत आहोत. तसेच जी मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत, त्यांमध्ये सर्दी, खोकल्याचे प्रमाण जास्त आहे. ते गंभीर स्वरुपाचे नसून, सध्या चिंता करण्याची गरज नाही. मात्र, रोजचा वाढत असणारा आकडा विचारात घेऊन आपण बालरोग तज्ज्ञांची येत्या दोन दिवसांत नेमणूक करत आहोत, तसेच यावेळी त्यांनी पालकवर्गाला आवाहन केले आहे, की अफवांवर विश्वास न ठेवता सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे मुलांना दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून घ्यावे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचना दिल्या असून, प्राथमिक केंद्रांच्या आरोग्य अधिकार्यांकडून त्या सूचना आशा वर्कर्स व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत गावोगाव पोहोच केल्या आहेत. यामध्ये मुलांना सकस आहार, घरातून कमीत कमी मुलांना बाहेर काढणे, तसेच घरात कुणाला ताप, थंडी, सर्दी, खोकला यासारखे आजार असतील, तर त्यांच्यापासून मुलांना वेगळे ठेवणे जेणे करून मुलांना संसर्ग होणार नाही. तसेच आशा वर्कर्सनी आपापल्या गावात आरोग्याचे नियम पाळतात की नाहीत याकडे लक्ष देणे. कारण, पावसाळ्यामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामांनी जोर धरलेला आहे. त्यामुळे बर्याच प्रमाणात लहान मुलांकडे दुर्लक्ष होऊन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नाहीत.