रुद्रा पिंळणकरने राष्ट्रीय स्पर्धेत पटकावली तीन सुवर्णपदके
। चणेरा । प्रतिनिधी ।
अलिबागच्या अवघ्या आठ वर्षीय रुद्रा विनय पिंळणकर हिने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या एमजेएफआय (MJFI) राष्ट्रीय लाठी, लाटी व दांडपट्टा स्पर्धा-2026 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. दहा वर्षांखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रुद्राने तब्बल तीन सुवर्णपदके जिंकत अलिबाग, रायगड आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
स्पर्धेतील एकल लाठी आणि अटॅक अँड डिफेन्स या प्रकारांमध्ये रुद्राने अंतिम फेरीत अनुक्रमे तेलंगणा आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंवर मात करत दोन सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर दांडपट्टा प्रकारातही तिने आपल्या वेगवान हालचाली, अचूक तंत्र आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
अवघ्या आठव्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अशी उल्लेखनीय कामगिरी करून रुद्राने आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप उमटवली आहे. तिच्या या यशामुळे क्रीडाक्षेत्रात अलिबागचे नाव राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उजळले आहे. रुद्राच्या या यशामागे प्रशिक्षक प्रियंका संदेश गुंजाळ, वेदांत संदेश सुर्वे आणि सिद्धार्थ अशोक पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे रुद्राने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रुद्राच्या या दैदिप्यमान यशाबद्दल क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ती महाराष्ट्र आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रुद्राच्या या अभूतपूर्व यशामुळे अलिबाग आणि रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, ही कामगिरी इतर बालकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.






