| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक वसाहतीत क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्यानंतर आरटीओच्या अधिकाऱ्याला धमकावत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी एका इसमाविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकी देणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाकडून तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यावर पकोटेक्स कंपनीसमोर वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. या वेळी एमएच-46-एफ-2641 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून निर्धारित क्षमतेपेक्षा चार टन अधिक वजनाची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. तसेच वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर मार्च 2023 नंतर वाहन कर भरलेला नसल्याचे समोर आले. याशिवाय प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा, योग्यता प्रमाणपत्र, परवाना आणि राष्ट्रीय परवाना अधिकृततेची वैधता संपल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे आरटीओच्या भरारी पथकाने ई-चलनद्वारे 50 हजार 500 रुपयांचे तडजोड शुल्क आकारून कारवाई केली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या वाशी जुहू गाव येथील सेक्टर 11 मधील राधेकन्हैया निवासातील नितीन रॉय (25) याने संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजयकुमार मोहिते यांनी रॉय याला ताब्यात घेतले. रॉय याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहीते यांनी दिली.







