। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळजवळील शेलू येथे वर्षासहलीसाठी आलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा उल्हास नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. हे कुटुंब शेलू येथे एका फार्म हाऊसवर पर्यटनासाठी आले होते.
ठाणे जिल्ह्यातील वांगणीजवळील डोणे गावातील अभिजित जाधव (40) हे आपल्या मुलीसह आणि आणखी पाच नातेवाईकांसमवेत शेलू येथील खारीक फार्म परिसरात फिरण्यासाठी आले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण जवळील उल्हास नदीच्या किनारी गेले. नदीकाठी उभ्या असलेल्या आपल्या लेकीचा फोटो काढण्यासाठी अभिजित जाधव दगडावर उभे राहिले. लेकीच्या आठवणी जपण्यासाठी कॅमेऱ्याचा क्षण टिपत असतानाच नियतीने क्रूर खेळी केली. दगडावरुन त्यांचा तोल गेला आणि ते थेट नदीच्या खोल पाण्यात कोसळले. त्यांना पोहता येत नसल्याने काही क्षणांतच ते पाण्यामध्ये दिसेनासे झाले.
घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस, स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोधमोहीम राबविली; मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर खोपोली येथील हेल्प फाऊंडेशनच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथक, पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने अभिजित जाधव यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.






