रुद्राशी टेमकरची चार सुवर्णपदकांवर मोहोर; तनिष शिंदेची दुहेरी सुवर्णभरारी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने, अलिबाग नगर परिषदेच्या सहकार्याने आयोजित नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील जलतरणपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी (दि.19) दिवसभर झालेल्या स्पर्धांनंतर विविध गटांतील 82 गुणवंत जलतरणपटूंना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. रुद्राशी टेमकरने चार सुवर्णपदकांवर मोहोर पाडली असून, तनिष शिंदेने दुहेरी सुवर्णभरारी घेतली. या स्पर्धेच्या माध्यमातून नगराध्यक्ष चषक मधून रायगडात जलतरणची नवी पिढी घडत असून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या दिशेने पाऊल पडत आहे.
यंदाची स्पर्धा केवळ विजेते ठरविण्यापुरती मर्यादित न राहता, जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना मोठ्या स्पर्धांसाठी तयार करण्याचे व्यासपीठ ठरली. विविध तालुक्यांतून आलेल्या शेकडो स्पर्धकांनी फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत जलतरणातील वाढती गुणवत्ता दाखवून दिली. एखादी क्रीडा स्पर्धा एका दिवसाची असते, मात्र त्या स्पर्धेतून निर्माण होणारे खेळाडू अनेक वर्षे जिल्ह्याची ओळख बनवत असतात. अलिबागमध्ये आयोजित नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेने याच विचाराला बळ दिल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीमध्ये गट-2 (2012) मधील तनिष शिंदे याने 50 मीटर फ्रीस्टाईल आणि 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदके, तर 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदके पटकावली. खुल्या महिला गटात रुद्राशी टेमकर हिने चारही प्रकारांत वर्चस्व राखत चार सुवर्णपदके जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यांच्यासह विविध वयोगटांतील अन्य 82 स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. पदके स्वीकारताना विजेत्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमान स्पर्धेच्या यशाची साक्ष देत होता.
पारितोषिक वितरण समारंभाला नगरसेवक अनिल चोपडा, नगरसेवक सागर भगत, नगरसेविका अश्विनी ठोसर, पोलीस निरीक्षक किशोर साळे, कर व प्रशासकीय अधिकारी श्रद्धा नवले, कर व प्रशासकीय अधिकारी प्रियांका वाघ, राष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक दिलीप वैद्य तसेच प्रशिक्षक दत्ता तरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांना नियमित सराव, शिस्त आणि क्रीडाभावना जपण्याचा संदेश दिला. ‘जिंकणे महत्त्वाचे आहेच; मात्र सातत्यपूर्ण मेहनतीतून स्वतःला अधिक सक्षम खेळाडू बनविणे हेच खरे यश आहे, असे सांगत त्यांनी सर्व खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अलिबागमध्ये आधुनिक क्रीडा सुविधा उभारल्यानंतर त्या सुविधांचा लाभ जिल्ह्यातील खेळाडूंना मिळावा, त्यांना सातत्याने दर्जेदार स्पर्धा उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही मोठे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक आणि वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून अशा उपक्रमांना सातत्याने चालना दिली जात असल्याची भावना क्रीडावर्तुळातून व्यक्त करण्यात आली.
प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले की, अलिबागमध्ये केवळ क्रीडा सुविधा उभारणे हा उद्देश नाही, तर त्या सुविधांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडविणे हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक मुलामध्ये क्षमता असते; तिला योग्य संधी, उत्तम प्रशिक्षक आणि दर्जेदार स्पर्धा मिळाल्या तर रायगडचा तिरंगा देशभर फडकू शकतो. नगराध्यक्ष चषक ही त्या मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे.
याच ध्येयाला पुढे नेत अलिबागमध्ये केवळ जलतरणापुरते मर्यादित न राहता बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ तसेच इतर वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाही नियमितपणे आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रशांत नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. क्रीडा संस्कृतीला व्यापक चालना देत अलिबागला सर्वसमावेशक क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रात सातत्याने होत असलेली गुंतवणूक, आधुनिक सुविधा आणि नियमित स्पर्धांचे आयोजन यामुळे अलिबाग आता केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर उद्याचे जलतरणपटू घडविणारे केंद्र म्हणूनही ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मत प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.









