उरणमध्ये कचऱ्याचे ढीग, डेंग्यूच्या सावटाखाली नागरिकांचे आरोग्य धोक्यात
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिकेच्या हद्दीत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या शहरभर पाहावयास मिळत आहे. नाल्यातील गाळ व कचरा काढून तो रस्त्याच्या कडेला ढीग करून टाकण्यात आला आहे. मात्र, अनेक दिवस उलटूनही हा कचरा उचलण्यात आलेला नसल्याने ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मान्सून तोंडावर आला असताना जून महिना अर्ध्याहून अधिक संपला, तरी नालेसफाईची कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे, ज्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे, त्या नाल्यांमधून काढलेला कचरा जागोजागी उकिरड्याप्रमाणे पडून आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण तर झालेच आहे, शिवाय दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
उरण शहरातील आनंदनगरसह इतर परिसरात नालेसफाईनंतर काढलेला कचरा अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून आहे. जर मुसळधार पाऊस सुरू झाला, तर हाच कचरा पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाले पुन्हा तुंबतील आणि पुन्हा त्याच नाल्यांची सफाई करून लाखो रुपयांची बिले काढण्याचा डाव तर नाही ना, असा संशय नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
सध्या उरण शहरात डेंग्यू, व्हायरल ताप, सर्दी-खोकला आणि इतर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत नाल्यातील कुजणारा कचरा, साचलेले पाणी आणि अस्वच्छ वातावरण हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे आरोग्य विभाग जनजागृतीचे फलक लावत आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर पडलेला कचरा प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल करत आहे. यासंदर्भात नगरपालिका आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. तसेच त्यांच्या विभागात प्रत्यक्ष भेट दिली असता ते कार्यालयातही अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक साटेलोटे असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.







