निकालपत्र तयार नसल्याने निकाल पुढे ढकलला
| मुंबई | प्रतिनिधी |
प्रमुख आरोपी म्हणून राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर चालवण्यात आलेल्या पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालकाच्या 20 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल येत्या शनिवारी विशेष सीबीआय न्यायालय देणार आहे. वास्तविक, विशेष न्यायालय मंगळवारी या प्रकरणाचा निकाल देणार होते. परंतु, निकालपत्र तयार नसल्याने आणि ते तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज भासणार असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने निकाल शनिवारपर्यंत पुढे ढकलला.
प्रकरणाचा निकाल आता 20 जून रोजी देण्यात येणार असल्याने विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पाटील यांच्यासह अन्य आरोपींना त्यावेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. मागील महिन्यातील सुनावणीच्या वेळी पाटील यांच्यासह आणखी एक आरोपी आरोग्य अस्वास्थ्याच्या कारणास्तव सुनावणीला अनुपस्थित होते. त्यावेळी, निकाल मंगळवारी (दि.16) देण्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले होते व सर्व आरोपींना न चुकता सुनावणीला उपस्थित राहण्याचे बजावले होते. धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांचे वडील पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडी चालकाची वीस वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांविरोधात खटला चालवण्यात आला.
डॉ. पद्मसिंह पाटील रुग्णवाहिनीतून न्यायालयात
विशेष न्यायालय खटल्याचा निकाल देणार हे तब्येत ठीक नसल्यामुळे थेट रुग्णवाहिनीतून न्यायालयात दाखल झाले होते. त्याचप्रमाणे, सुनावणीसाठी पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, मुलगा आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खा. ओमराजे निंबाळकर, जयराजे निंबाळकर यांच्यासह चालक समद काझी यांची पत्नी आणि मुलगा देखील न्यायालयात उपस्थित होते.
गेल्या 14 वर्षांपासून खटल्याची सुनावणी
चौदा वर्षांपूर्वी म्हणजेच 4 जुलै 2011 रोजी विशेष न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीदरम्यान पाटील यांच्यावतीने तब्बल साडेबाराशे पानाचे लेखी म्हणणे मांडण्यात आले. त्यात पवनराजे निंबाळकर यांच्या कुटुंबावरच गंभीर आरोप करण्यात आले.
प्रकरण काय ?
पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. पवनराजे यांची हत्या केल्यानंतर दोन हल्लेखोरांनी चालक समद काझी याचीही गोळी घालून हत्या केली होती. या हल्ल््यात पवनराजे आणि त्यांच्या चालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने पाटील व इतरांनी मिळून पवनराजे यांच्या हत्येचा कट रचला. अनेक महिने या हत्येचा कट रचण्यात येत होता. त्यानंतर, या कटाची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असा सीबीआयचा आरोप आहे. घटनेनंतर तीन वर्षांनी, 6 जून 2009 रोजी पाटील यांना ते खासदार असताना सीबीआयने अटक केली होती.







