आठ किलोमीटरचा प्रवास जीवघेणा
। महाड । प्रतिनिधी ।
लाडवली ते मांडला या सुमारे आठ किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे साईड पट्ट्याही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
या रस्त्याचा वापर करणारे शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, कामगार वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवत अक्षरशः तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार मुरारबाजी देशपांडे यांची जन्मभूमी किंजळोली याच मार्गावर आहे. तसेच मांडले येथील प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लाडवली–मांडला रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच, या गंभीर प्रश्नाकडे संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






