वाढदिवसानिमित्त थेरोंडा शाळेला मोलाची भेट
अनिल कालेकर यांची सामाजिक बांधिलकी
| रेवदंडा | प्रतिनिधी |
आजच्या काळात वाढदिवस म्हणजे केक कापणे, फटाके फोडणे किंवा मोठ्या प्रमाणावर खर्च करणे, अशीच सर्वसाधारण धारणा झाली आहे. मात्र समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपणारे व्यक्तिमत्त्व अजूनही आपल्या समाजात आहेत, याची प्रचिती अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथे आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत अनिल कालेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त थेरोंडा येथील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 1 ला 500 लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे योगदान दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा द्यानदेव खंडारे यांच्या विनंतीनुसार ही टाकी शाळेला देण्यात आली.
गावातील शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि सामाजिक जडणघडणीचे मंदिर असते. अनेक यशस्वी अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते आणि उद्योजक यांची पायाभरणी अशाच ग्रामीण मराठी शाळांमध्ये झाली आहे. मात्र बदलत्या काळात इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे अनेक मराठी शाळा विद्यार्थीसंख्येअभावी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत गावातील शाळांना स्थानिक नागरिक, माजी विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देणे ही काळाची गरज बनली आहे.
अनिल कालेकर यांनी केलेली ही मदत केवळ पाण्याची टाकी देण्यापुरती मर्यादित नसून गावातील शाळांविषयी असलेली आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक जबाबदारी अधोरेखित करणारी आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही टाकी उपयुक्त ठरणार आहे. याप्रसंगी ग्रामस्थांनीही कालेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक करत इतरांनीही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर आनंदाचे क्षण सामाजिक उपक्रमांद्वारे साजरे करण्याचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.
शाळेचे संवर्धन हीच समाजसेवा
आपल्या गावातील मराठी शाळांकडे पुन्हा प्रेमाने आणि अभिमानाने पाहण्याची आज गरज आहे. आपल्या मुलांना संस्कार, संस्कृती आणि मातृभाषेचे शिक्षण देणाऱ्या या शाळा टिकल्या तरच गावाची ओळख टिकून राहणार आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या शाळेशी नाते जोडून तिच्या विकासासाठी हातभार लावला, तर मराठी शाळांचे भवितव्य अधिक उज्ज्वल होईल. गावची शाळा हीच गावाची शान; तिचे संवर्धन हीच खरी समाजसेवा हा संदेश अनिल कालेकर यांच्या या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.







