दोन चोरट्यांना अलिबाग पोलिसांनी केले जेरबंद
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्कुटीमधील पेट्रोल संपल्याने ते आणण्यासाठी गेलेल्या मित्राच्या स्कूटीच्या डिकितून 20 हजार रुपयांसह आतील बॅग इतर साहित्यासह गाडीचे आरसे काढून चोरण्याची घटना वरसोली येथील स्मशानभूमी जवळ घडली. अलिबाग पोलिसांनी सीसीटिव्हीच्या फुटेजच्या आधाराने सदर दोघा चोरट्यांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे.
अलिबाग तालुक्यातील वरसोली स्मशानभुमीजवळ राज प्रकाश पाटील रा.आक्षी ता.अलिबाग यांनी त्यांची स्कुटी पेट्रोल संपल्याने वरसोली स्मशानभुमी येथे उभी करुन ठेवुन ते पेट्रोल आणण्याकरीता अलिबाग येथे गेले होते. याचा फायदा घेत दोघाजणांनी स्कुटीची डिकी कशाने तरी उघडुन सदर डिकिमध्ये असलेली फिर्यादी यांचे मालकिची जिमची काळया रंगाची बॅग व त्यातील रोख रक्कम 20 हजार/- रुपये, जिमच्या गोळया- औषधे, किटकॅट कंपनीची उशी, स्कुटीचे दोन्ही आरसे चोरीकरुन नेवुन स्कुटीची नंबर प्लेट वाकवुन त्याचे नुकसान केले.
पेट्रोल घेवून परत आल्यावर राज पाटील यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास करताना पोलिस हवालदार रुपेश निगडे यांनी सदर मार्गावरील सीसीटिव्हीच्या फुटेजच्या आधाराने शोध घेण्यास सुरुवात केली. तेंव्हा हातात बॅग घेवून जात असलेले दोघे जण दिसले. राज पाटील यांनी दोघांना ओळखताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस हवालदार रुपेश निगडे हे करीत आहेत