| आगरदांडा | प्रतिनिधी |
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गेले बारा दिवस समुद्राकिनारी अमली पदार्थाची पॉकिटे सापडत आहेत. ती नागरिकांच्या हाती लागू नये याची खबरदारी म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर रोजच्या रोज गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक निशा जाधव समुद्रकिनारी गस्त घालत असताना अमली पदार्थाची दोन पाकिटे बेवारस व भिजलेल्या स्थितीत आढळून आली.
या पाकिटांचे वजन दोन किलो 184 ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत 8 लाख 73 हजार 600 रुपये आहे. यावेळी मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, पोलिस नाईक -सुरेश वाघमारे, पोलीस नाईक परेश म्हात्रे, नांदगाव तलाठी अरविंद देशमुख, ग्रामपंचायत लेखनिक मुकेश मिटकर, पोलीस पाटील विश्वासराव महाडिक, भरत बेलोसे, चक्रधर ठाकूर, दंगल नियंत्रण पथकाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी 30 जण तर मुरुड पोलीस ठाण्याचे दहा पोलीस शिपाई उपस्थित होते.