| चेन्नई | वृत्तसंस्था |
भारतीय संघाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यातच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर नमवणे अधिकच अवघड असेल, असे मत न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने व्यक्त केले.
गतउपविजेत्या न्यूझीलंडच्या संघाने यंदाच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले असून अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नई (दोन सामने) येथील वातावरण आणि खेळपट्टय़ांशी योग्यप्रकारे जुळवून घेतले आहे. न्यूझीलंडचा आता रविवारी धरमशाला येथे भारतीय संघाविरुद्ध सामना होणार आहे. भारतीय संघही अपराजित असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सामन्यासाठी सँटनर उत्सुक आहे.धरमशाला येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. खेळपट्टीकडून चेंडूला वेग आणि उसळी मिळते. परंतु भारताविरुद्ध आमच्या सामन्यावेळी अशीच परिस्थिती असेल का हे पाहावे लागेल असे सँटनर म्हणाला.