| कोर्लई | वार्ताहर |
महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यातर्फे अलिबागच्या प्रिझम सामाजिक विकास संस्थेमार्फत आंतराराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम 2023-24 अंतर्गत मुरुड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मौजे बोर्ली, काशीद व सर्वे येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याविषयी पथनाट्य कार्यक्रमाचे माध्यमातून ग्रामस्थांमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमधे जनजागृती करण्यात आली.
यामध्ये पौष्टिक तृणधान्य नाचणी, राळा, भगर, ज्वारी, बाजरी, राजगीरा यामध्ये असलेल्या पोषण मूल्याचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता बोर्ली नाका व काशिद येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वे येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जनप्रबोधन करण्यात आले. पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ, कृषी सहाय्यक अतुल उपाध्ये, बोर्ली सजाचे नथुराम रोहेकर, साळाव सजाचे व प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सहकार्यानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.