उच्च न्यायालयात सरकारने दिली माहिती
| मुंबई | प्रतिनिधी |
वर्ष 2023 अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्याची घोषणा सरकारने केली होती. वर्ष संपल्यानंतर सरकारचे आश्वासन पूर्ण झाले नाही. आता मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी सरकारने 31 डिसेंबर 2024 ही नवीन तारीख दिली आहे. उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान सरकारने ही माहिती दिली.
त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचाही प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे. प्रकल्पाला होणाऱ्या विलंबामुळे वाढणारा खर्च हा जनतेचाच पैसा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुमारे 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणवासियांचे हाल संपण्याची चिन्ह नाहीत. डिसेंबर 2023चा मुहूर्त हुकल्याची प्रशासनाने आज कबुली दिली. वर्ष 2011 ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.
प्रकल्पाचा विलंब थेट मूळ खर्चावर प्रभाव टाकतो, शेवटी पैसा जनतेच्याच खिशातून जाणार असे न्यायालयानेे म्हटले. या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी कोणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला न्यायालयानेे दिले. या निर्देशानंतर न्यायालयाने ओवैस पेचकर यांची याचिका निकाली काढली. डिसेंबर 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण न झाल्यास याचिकाकर्त्यांना अवमान याचिका दाखल करण्याची मुभा न्यायालयाने दिली.







