। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वेश्वी-अलिबाग आणि लक्ष्मी, शालिनी महिला महाविद्यालय पेझारी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वाङ्मय मंडळ आणि मराठी भाषा विभाग यांच्या वतीने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल बांगर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, मराठी विभाग व कला विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील, प्रा. रूपाली पाटील, विज्ञान विभाग प्रमुख प्रा सुजित पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ रसिका म्हात्रे, आयक्यूएसी प्रमुख प्रा. केतकी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग प्रत्येक 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त विशेष अंकांचे प्रकाशन करीत असतो पु.ल. देशपांडे विशेषांक, मराठी बोली विशेषांक, नक्षत्राचे देणे, मराठी कवी विशेषांक, शिलालेख लेणी विशेषांक, असे सलग चार विशेषांकाचे प्रकाशन याआधीच विभागात झालेले आहे. यावर्षी विभागाने संत साहित्य विशेषांकाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले. या अंकामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने विशेषतः संत साहित्यावर प्रकाश टाकला. साजिरी जुईकर, प्रतीक्षा पाटील, जयदीप म्हात्रे, आदित्य झावरे, अनुष्का म्हात्रे, अवंतिका माने, केतकी ठाकूर, मयुरी पाटील, साहेबा बानो, सलोनी झावरे, आदी विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला. या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान मराठी विभागाचा विशेषांक हा संत साहित्यावर आधारभूत असल्याने विभागाच्या वतीने संतदर्शन हडशी पुणे येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले, यानिमित्ताने त्यांनी आपल्या अहवाल वाचनातून मराठी भाषा मराठी साहित्य याचबरोबर मराठी विभागातील एकंदरीत कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा डॉ.अनिल बांगर यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य या अनुषंगाने विद्यार्थ्यांबरोबर हितगुज साधून सखोल मार्गदर्शन केले. लेखक वि. वा. शिरवाडकर यांचे नटसम्राट या कलाकृतीचे किंग लियर पासून झालेले रूपांतर असताना लेखकांचे योगदान यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला महाविद्यालयाच्या मराठी विभागाने संत साहित्यावर प्रकाश टाकून आणि प्रत्यक्ष हडशी येथील संत साहित्य येथे भेट देऊन त्याबद्दलची महती समजून घेतली. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.ओमकार पोटे यांनी आपल्या अध्यक्ष वक्तव्यात मराठी भाषेतील बदलत्या स्थित्यंतराचा आढावा घेऊन संत साहित्याची महती सांगून मराठी विभागाच्या विशेषाकाबद्दल समाधान व्यक्त केले. महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून खर्या अर्थाने मराठी भाषा दिन उत्सव साजरा केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभागातील प्रा.रूपाली पाटील यांनी केले तसेच, कार्यक्रमाचे आभार मानले.