रस्त्यावरील डांबर धुवून गेल्याने अपघाताची शक्यता
| नेरळ | प्रतिनिधी |
कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर जून महिन्यात करण्यात आलेले डांबरीकरण नेरळ गावात नित्कृष्ट दर्जाचे झाले होते. रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने डांबरीकरणासाठी टाकण्यात आलेली ग्रीड वाहनचालक यांच्यासाठी धोक्याची बनली आहे. दरम्यान, राज्यमार्गावर नेरळ गावाच्या हद्दीतील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून दुचाकीचालक हे रस्त्यावर गाड्या घसरून पडत आहेत.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर शेलूपासून वडवली गावापर्यंत रस्त्यावर डांबरीकरण मे अखेरपासून जून पहिल्या आठवड्यात करण्यात आले होते. पी पी खरीपातील कम्पनियाकडून हा कर्जत कल्याण रस्त्यावरील कर्जत तालुका हद्दीची जबाबदारी शासनाने दहा वर्षासाठी दिली आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्याअगोदर रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला. मात्र, नेरळ गावातील खांडा पासून हुतात्मा चौक फॉरेस्ट चौकीपर्यंत रस्त्यावर टाकलेले डांबर हे नित्कृष्ट दर्जाचे टाकले होते. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यावर टाकलेलं डांबर निघून जाऊ लागले आणि बैलगाडी मार्गासारख्या चकाच्या राज्यमार्गावर पडल्या आहेत. त्यामुळे प्रामुख्याने दुचाकी चालक यांची अशा रस्त्याने गाडी चालवताना भंबेरी उडत आहे.
दुसरीकडे रस्त्यावर डांबरीकरणासाठी वापरलेली ग्रीड हि सर्वत्र आढळून येत आहे. त्या ग्रीडमुळे रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीच्या प्रचंड धूळ उडत आहे. दुचाकीस्वार त्या ग्रीडवरून चाके घसरून पडत आहेत. तर रस्त्याने चालणारे वाटसरू यांच्या नका तोंडात धूळ पडून श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाचा कमी झालेला जोर लक्षात घेऊन नेरळ गावातील खांडा ते हुतात्मा चौक या भागात रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करून घ्यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ मनोहर हजारे यांनी केली आहे. तर नेरळ टॅक्सी चालक किशोर भोईर यांनी रस्त्यावर ती ग्रीड बाजूला करण्याचे काम बांधकाम खात्याने करून घ्यावे आणि वाहनचालक यांचे अपघात टाळावेत अशी मागणी केली आहे. या कल्याण कर्जत रस्त्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय उरण येथे आहे आणि त्यामुळे त्या कार्यालयाशी संपर्क होऊ शकला नाही.







