राखी पाठवण्यासाठी पोस्टाचे राखी पाकीट
| रायगड | प्रतिनिधी |
महिलांनो, रक्षाबंधनसाठी तुमच्या प्रिय भावांना पोस्ट विभागाने तयार केलेल्या विशेष राखी पाकिटामधून राख्या पाठवू शकणार आहात. भाऊ आणि बहिणीमधील अतूट नात्याचा रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी ग्राहकांसोबत अतूट विश्वासाचे नाते असणाऱ्या पोस्ट विभागाने विशेष राखीचे पाकीट आणले आहे. या पाकिटाची किंमत 12 रुपये आहे. बहिणीने पाठविलेली राखी प्रत्येक भावापर्यंत वेळेत पोहोचावी, यासाठी पोस्टाच्या पुणे विभागाने ही विशेष योजना तयार केली आहे.
डिजिटल शुभेच्छांच्या युगात प्रत्यक्ष मिळणारी राखी आणि त्या वेळेत पोहोचविणाऱ्या पोस्टाची विश्वासार्हता आजतागायत कायम आहे. बहिणीने मोठ्या प्रेमाने खरेदी केलेली राखी तितक्याच प्रेमाने टपाल विभागाच्या राखी पाकिटांमधून यंदा पाठविली जाणार आहे. ही राखी भावापर्यंत वेळेत पोहचविण्याची जबाबदारी पोस्टाची असते. ती योग्यरित्या पाठविण्यात येते. हे पाकिट वॉटर प्रूफ असून पावसात भिजण्याची शक्यता नाही. या विविध आकर्षक रंगातील लिफाफ्यांना डिंक लावण्याची गरज नाही.