। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, अलिबाग येथे मोदक स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये खुल्या गटात सरला नाईक आणि विद्यार्थी गटात सलोनी मयेकर यांनी प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या पंधरा वर्षाची या स्पर्धेची परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली आहे. या स्पर्धेला प्रमुख परीक्षक म्हणून नलिनी काकू मुंबईकर ,यू ट्यूब सेलिब्रिटी, रॅडिसन ब्लूचे बेकरी विभागातले शेफ सुरेश म्हात्रे, आणि रॅडीसन ब्लूमधील एचआर व्यवस्थापक ज्ञानेश्वर राऊत यांनी काम पाहिले.
विद्यार्थी व खुला गट अशा दोन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. खुल्या गटात अनेक सुगरणींनी भाग घेतला होता. तसेच विद्यार्थीदेखील या स्पर्धेत उत्साहात सहभागी झाले होते. उत्तमोत्तम सादरीकरण, नवनवीन संकल्पना आणि भन्नाट चवीचे मोदक, तयार करण्यात आले होते. स्पर्धकांनी तयार केलेल्या मोदकांची चव स्पर्धकांनी घेतली. त्यानंतर त्या मागील संकल्पना समजून घेतली. अखेर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. खुल्या गटात सरला नाईक यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून मिरा घरत यांनी द्वितीय व प्रिती म्हात्रे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थी गटात सलोनी मयेकर यांनी प्रथम, मानस म्हात्रे यांनी द्वितीय व अक्षय महाडिक यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रिया पडवळ, वृषभ भोईर व ऋतिक गायकवाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले.
या सोहळ्याची संकल्पना, त्याचे सादरीकरण आणि ते पूर्ण करण्याचे महत्त्वाचे काम प्रा. रश्मी वाघे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रा. श्रेयस म्हात्रे, आणि प्रा. गंधर्व पाटील यांनी केले. प्रा. आशुतोष गुरव, प्रा. स्वरांगी कवळे, आश्लेषा लोहार, महेश वेळे आणि निलदीप पाडावे यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. तर प्रा. अनुराधा तेरेदेसाई यांनी आभार व्यक्त केले.







