। पनवेल । वार्ताहर ।
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला असून हे अभियान यशस्वी होण्यासाठी योगदान दिले आहे. या अभियानामध्ये पनवेल तालुक्यातील तळोजा येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक पाचनंद शाळेनेदेखील सहभाग घेतला होता. यावेळी शाळेने नवनिर्मितीचा ध्यास घेत या स्पर्धेत एक वेगळी छाप पाडत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे.
यावेळी पाचनंद शाळेने तालुका व जिल्हास्तरीय कमिटीसमोर शाळेच्या विद्यार्थ्यांनी इत्यंभूत माहिती सांगितली. तसेच, विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना परसबाग, स्टीम लॅब, वाचनालय, क्रीडा विभाग, वर्ग खोल्या व शालेय परिसराची माहिती दिली. याचबरोबर पाचनंद शाळेने परसबागेतील विविध भाज्या, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छ व तंबाखूमुक्त शालेय परिसर या प्रमाणपत्रासहित साक्षांकित असलेली शाळा तर स्वच्छता मॉनिटर या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करून त्यातही विद्यार्थ्यांनीदेखील बक्षीस मिळवले आहे.





