तळा कृषी विभागाकडून प्लस्टिक ड्रमचे वाटप
। तळा । वार्ताहर ।
रोवळा येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निविष्ठा निर्मितीसाठी 10 जानेवारी रोजी श्रीराम शेतकरी गट व जय श्रीराम शेतकरी गट या गटातील शेतकर्यांना तळा कृषी विभागामार्फत जीवामृत,बिजामृत, दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी 225 लिटर आकाराच्या ड्रमचे वाटप करण्यात आले.
तळा तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत या गटांच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर थांबवणे, जमिनिची सुपिकता व आरोग्य सुधारण्यासाठी व सेंद्रिय शेतमाल उत्पादीत व विक्री करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्यासाठी सेंद्रिय निविष्ठा जसे की जीवामृत, दशपर्णी अर्क, अमृत पाणी, पंचगव्या या निविष्ठा शेतकर्यांनी घरीच तयार कराव्यात यासाठी कृषी विभागाने गटातील सर्व शेतकर्यांना प्रशिक्षण दिले आहे या योजनेचा एक भाग म्हणून सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिक ड्रमचे वाटप कृषी विभागाकडून शेतकर्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांना आता सेंद्रिय निविष्ठा घरीच तयार करणे शक्य होणार आहे. सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरीच तयार केल्यामुळे शेतीवरील खर्चाची बचत करणे शक्य होणार आहे. नैसर्गिक शेती मिशन योजनेचा लाभ मिळत असल्याने गटातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ड्रम वाटपाच्या कार्यक्रमास तळा पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश वाघमारे, गोविंद पाशीमे, सचिन लोखंडे, विठोबा घाडगे व भागोजी शिगवण तसेच गावचे अध्यक्ष रामचंद्र म्हातले उपस्थित होते.