। जालाना । प्रतिनिधी ।
जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात मित्राने दारु न पाजल्याने त्याला शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून मागेपुढे न बघता थेट मित्राच्या गळ्यावर कुर्हाडीने वार करुन त्याला ठार केले. याप्रकरणी आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तासात जेरबंद केले. ही घटना शुक्रवारी (दि.25) रात्री घडली.
जालना शहरातील कन्हैयानगरातील नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे याला देऊळगावराजा रस्त्यावरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत जामवाडी शिवारात ठार मारले होते. आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. आरोपीचा शोध सुरू असताना माहिती मिळाली की, नरेश उर्फ बंटी रंजवे याचा मित्र संदीप ज्ञानेश्वर राऊत याने खून केला असून, तो सध्या जामवाडी येथे आहे. त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
संदीप राऊत याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, भागीरथी टी हाऊसवर असतांना नरेश उर्फ बंटी याने त्याला दारु पाजण्याचा आग्रह केला. संदीपने त्याला दारु न पाजल्याने दोघांमध्ये झटापटी होऊन नरेशने संदीपच्या आईवर शिवीगाळ केली. या गोष्टीचा राग मनात धरुन संदीपने लोखंडी कुर्हाडीने नरेशच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







