। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानचा कब्जा मिळविल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्याने खळबख माजली आहे. यामुळे तालिबानला धक्का लागला असून या घटनेची जबाबदारी आयसिसने घेतली आहे. हमदुल्लाह मुखलीस असं या तालिबानी कमांडरचं नाव आहे. काबुलमधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात मुखलीसचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.
तर दुसरीकडे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने आयसिसवर रुग्णालयातील नागरिक, डॉक्टर, रुग्णांवर हल्ला केल्याचा आरोप केलाय. तसेच या हल्ल्यानंतर तालिबानच्या लडाऊंनी केवळ 15 मिनिटातच प्रत्युत्तर दिल्याचा दावा मुजाहिदने केला आहे. हल्ल्यानंतर तालिबानने अमेरिकेच्या सैन्य छावणीत मिळालेल्या हेलिकॉप्टरचा उपयोग करून तातडीने रुग्णालयाच्या ठिकाणी विशेष दलाला उतरवलं. त्याचवेळी एका आत्मघातकी बॉम्बरने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःला स्फोटकांनी उडवले. त्यानंतर इतरांनी रुग्णालयात गोळीबार केला, अशी माहिती तालिबानने दिली.