| अलिबाग | प्रतिनिधी |
अतिवृष्टीमुळे सागाव आदीवासीवाडी येथे अनेक घरांचे नुकसान झाले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने येथील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. शेकापच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. नुकसानग्रस्तांना शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. परंतु, शेकापने सामाजिक बांधिलकी जपत मदत केल्याने नुकसानग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली होती. अलिबाग तालुक्यातील सागाव आदिवासीवाडीमधील अनेकांच्या घरांचे पत्रे उडाल्याने घराचे नुकसान झाले होते. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून नुकसानीची पाहणी केली. परंतु, शासनाकडून वेळेवर मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाच्या एक पाऊल पुढे टाकत शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत आर्थिक मदतीचा हात नुकसानग्रस्तांना देण्यात आला. सागाव आदिवासीवाडी येथील संतोष वाघमारे यांना शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली. अलिबाग तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नरेश गोंधळी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास वालेकर, शेकाप तालुका कामगार आघाडीचे सदस्य विनोद पाटील आदी शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते आर्थिक मदत नुकसानग्रस्तांना देण्यात आली.शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आर्थिक आधार दिल्याने नुकसानग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.






