। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील जाकिमिर्या गावातील पाटीलवाडी येथील समुद्र किनार्यावर 25 फुटाहून अधिक लांबीचा हा महाकाय देवमासा मृतावेस्थेत आढळला आहे. कुजलेल्या अवस्थेत किनार्यावर लागलेल्या या देवमाशाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात गेल्या पाच वर्षात मृतावस्थेतील देवमासा सापडल्याच्या नोंदी झाल्या आहेत. त्यात जाकिमिर्या येथील सापडलेल्या देवमाशाची भर पडली आहे.
पौर्णिमेच्या उधाणाबरोबर हा महाकाय देवमासा मध्यरात्रीच्या सुमारास किनारी भागाला लागला. सुरवातीला तो पाण्यात दिसून आला. लाटांबरोबर तो वाळूत आला.
माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या माशांची लांबी 25 फुट असून त्याचा मृत्यू समुद्रातच झाला होता. मृतावस्थेत तो वाहत किनार्यावर लागला. काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता. त्याची वैद्यकीय तपासणीही करणे अशक्य होते. त्यामुळे माशाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. वाळूतच मोठा खड्डा खोदून त्याला पुरण्यात आले आहे.