| रेवदंडा | विषेश प्रतिनिधी |
अलिबाग ते वडखळ व अलिबाग ते रेवदंडा या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणवर रहदारी सुरू असते. सुट्ट्यांच्या दिवशी तर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. यादरम्यान, पोलीस व महाराष्ट्र शासनाचे नामफलक लावलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या वाहतूक कोंडी करून दमदाटी करताना दिसत आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे नामफलक असणाऱ्या गाड्या अधे-मधे घुसवून वाहतुक रोखतात आणि इतर चालकांशी उद्धटपणे बोलून, अरेरावी करत धमक्या देतात. तसेच, काही ठिकाणी या नामफलकांचा गैरफायदा घेत अपव्यवहार करतात. तर, काही ठिकाणी अपघाताला देखील कारणीभुत ठरतात. नुकतीच नवी मुंबईत एक घटना घडली. एका मद्यधुंद इनोव्हा कार चालकाने शनिवारी (दि.7) अनेक वाहनांना धडक दिली. त्या कारवर ‘पोलीस’ नावाचे नामफलक होते. तसेच, त्या कारमध्ये मुंबई पोलीस वरिष्ठ निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र देखील आढळले. मात्र, त्या मद्यधुंद चालकाने त्या अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा घेतला का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे अशा घटना अलिबाग तालुक्यातील महामार्गावर देखील घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, रायगडचे वाहतूक शाखेचे उपप्रादेशिक कार्यालय अधिकारी अशा गाड्यांची मालकी तपासून चौकशी का करत नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे. तसेच, खोट्या नाम फलकांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
खोट्या पोलीस किंवा महाराष्ट्र शासन नामफलकांचा गैरवापर ही गंभीर बाब आहे. मोटार व्हेईकल कायद्यांतर्गत गाडी मालकीची तपासणी आणि चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, जेणेकरून जनतेचा विश्वास राखला जाईल.
-ॲड विनोद नाईक,
सामाजिक कार्यकर्ते







