| उरण | प्रतिनिधी |
उरण द्रोणागिरी नोड येथील रस्ता सुशोभीकरण्यासाठी सिडकोकडून सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून लावण्यात आलेली नारळाची झाडे काही समाज कंटकांकडून जाळून टाकली आहेत. या आगीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खारफुटीच्या झाडांना देखील झळ लागली असून, ती झाडे देखील होरपळली आहेत. त्यामुळे सिडको दुर्लक्षित पणाच्या विरोधात निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ या माध्यमातून सिडकोने हाती घेतला आहे. त्या धर्तीवर सिडकोने पागोटे, भेंडखळ, करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यांवर सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून नारळाची 4 हजार झाडे लावली आहेत. या झाडांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ही सिडकोची आहे. त्यामुळे सिडको दरवर्षी पावसाळ्यानंतर या झाडांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन नारळाच्या झाडांची देखभाल करत आहे. मात्र, सिडकोच्या दुर्लक्षित पणामुळे या रस्त्याच्या बाजूला काही परप्रांतियांनी बेकायदेशीर टपऱ्या व झोपड्या बांधल्या असून त्यामध्ये अवैध व्यवसाय सुरू केला आहे. त्यातील काही व्यवसायिक व सिडकोकडून झाडांचे जतन, संवर्धन करण्याचा ठेका घेणारे ठेकेदार हे झाडा जवळील गवत काढून न टाकता ते गवत जाळून टाकत आहेत. तरी सिडकोने ही झाडे जाळणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी सध्या जनतेतून करण्यात येत आहे.






