नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला दिबांचे नाव देण्याची मागणी
| रसायनी | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले. गेल्या चार वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, राज्य सरकारने केंद्राकडे नावाबाबत प्रस्ताव पाठविल्यानंतरही त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांनी आझाद मैदानात एकत्र येत राज्य सरकार व मंत्रिमंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लवकरच यासंदर्भात मोठे आंदोलन उभारण्यात येणार असून, पुढील रणनीती जाहीर केली जाईल, असे कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, भूमीपुत्र नेते तथा खासदार बाळ्या मामा म्हात्रे, कृती समिती सदस्य व राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात मुंबई व रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी बांधवांसह विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







