डॉ. प्रियांक म्हात्रे यांचा ‘सर्वात तरुण कृषी शास्त्रज्ञ’ म्हणून सन्मान
| हमरापूर | संतोष पाटील |
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वढाव या छोट्याशा गावातून देशाच्या कृषी संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेणाऱ्या डॉ. प्रियांक म्हात्रे यांचा भारत सरकारच्या कार्यक्रमात ‘सर्वात तरुण कृषी शास्त्रज्ञ’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. हैदराबाद येथे झालेल्या या कार्यक्रमात मिळालेल्या सन्मानामुळे पेण तालुका आणि रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.
पेण तालुक्यातील वढाव येथील डॉ. हनुमान म्हात्रे यांचे सुपुत्र डॉ. प्रियांक म्हात्रे यांचा हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात ‘सर्वात तरुण कृषी शास्त्रज्ञ’ म्हणून सन्मान करण्यात आला. भारत सरकारच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या डॉ. प्रियांक म्हात्रे यांनी अवघ्या 26 व्या वर्षी भारतीय अनुसंधान केंद्र दिल्ली येथे डॉक्टर ऑफ फिलॉसिफी ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी ॲग्रीकल्चर रिसर्च सर्विसमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवून मोठे यश संपादन केले. सध्या ते रिसर्च न्यू स्टाईल नून स्टाईन सिमला येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नेमाटोलॉजी या विषयावरील त्यांच्या संशोधनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
कृषी संशोधन क्षेत्रात त्यांनी अमेरिकेत केब्रिंज विद्यापीठ, त्याचबरोबर युके, मास्कोमध्ये ॲग्रीकल्चर अशा विविध देशांतील विद्यापीठांमध्ये संशोधन प्रबंध सादर केले आहेत. विशेषतः भारत सरकार तसेच इतर आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठांमध्ये त्यांच्या संशोधनाची दखल घेण्यात आली आहे. वाशी खारेपाट परिसरातील वढावसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत कृषी संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेतल्यामुळे डॉ. प्रियांक म्हात्रे यांनी केवळ पेण तालुकाच नव्हे तर, संपूर्ण रायगड जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे भविष्यात शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या उल्लेखनीय यशामुळे वढाव गाव, वाशी पंचक्रोशी, पेण तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातून येऊन राष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रात नाव कमावणे ही मोठी बाब आहे. डॉ. प्रियांक म्हात्रे यांनी तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
स्थानिक नागरिक,
वढाव







