| उरण | प्रतिनिधी |
सोन्याचा भाव दीड ते दोन लाखांच्या घरात पोहोचला असतानाही उरणमध्ये दररोज नवनवी सोन्याची दुकाने उघडत आहेत. महागाईचा आगडोंब उसळलेला असताना आणि सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलेला असताना, सोन्याच्या या व्यवसायात मात्र ‘सोन्याची खाण’ सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असला तरी दुसऱ्या बाजूला सोन्याचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यातच जमिनी, सदनिका आणि गाळ्यांचे भाडेही प्रचंड वाढले आहे. सध्या गाळ्यासाठी कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये ते लाखांच्या वरती भाडे मोजावे लागत असताना, उरण शहर व तालुक्यात तब्बल 200 ते 300 सोन्याची दुकाने कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश दुकाने भाडेतत्त्वावर चालवली जात आहेत, हे विशेष लक्षवेधी आहे. एकीकडे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेले सोने आणि दुसरीकडे दर महिन्याला उघडणारी नवीन दुकाने हा विरोधाभास अनेक प्रश्न निर्माण करतो. एवढ्या प्रचंड खर्चातही हा व्यवसाय ‘फायदेशीर’ ठरत असेल, तर यामागे काहीतरी ‘गडबड’ असल्याचा संशय नागरिकांमध्ये बळावत आहे.







