खारेपाट शेकापचा आत्मा: जयंत पाटील यांचे प्रतिपादन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच गरीब, कष्टकरी आणि दबलेल्या घटकांचे नेतृत्व केले असून, त्यामुळेच आजही सर्वसामान्यांचा या पक्षावर ठाम विश्वास आहे. खारेपाट विभागीय शेकाप कार्यालयाचे उद्घाटन हा केवळ सोहळा नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचे केंद्र ठरणार आहे. खारेपाट हा शेकापचा आत्मा असून, येथून पक्षाची अधिक भक्कम उभारणी करून जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. तसेच शेकापचा लाल बावटा कधीही खाली पडू देणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यासोबत राहीन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अलिबाग तालुक्यातील पेझारी नाक्याजवळ उभारण्यात आलेल्या अद्ययावत खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 19) सायंकाळी जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, रायगड बाजार समितीचे चेअरमन नृपाल पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक, विविध कार्यकारी संस्था व धान्यकोटी फेडरेशनचे अध्यक्ष निनाद पाटील, सिध्दाली पाटील, ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, सहचिटणीस नरेश म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, जिल्हा वाचनालय कार्याध्यक्षा शैला पाटील मोहन धुमाळ, सुरेश खोत, शरद वरसोलकर, सोनाली मोरे, निलेश खोत, दिपक पाटील, सत्यविजय पाटील, छाया पिंगळे, विक्रांत वार्डे, अलिबागच्या माजी नगरसेविका संजना कीर, विद्यमान नगरसेवक अनिल चोपडा, प्रफुल्ल पाटील, विलास म्हात्रे, महेंद्र ठाकूर, अनिल पाटील आदी मान्यवर, शेकापचे पदाधिकारी, चिटणीस मंडळाचे सदस्य, पक्षाच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शेतकरी, कामगारांचे कैवारी स्व. प्रभाकर पाटील आणि माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या आशीर्वादाने हे कार्यालय उभारण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, संघर्षातून उभा राहिलेला शेकाप हा पक्ष आहे. राजकारणात जय-पराजय होत असतो, मात्र या भागातील लढे आणि आंदोलने ही प्रेरणादायी आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून नव्या जिद्दीने पक्ष उभारणीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. गावोगावी जाऊन पक्षवाढीसाठी काम करत सांबरी ते नवगाव या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय केंद्रबिंदू ठरेल. गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढत त्यांच्या हक्कांसाठी काम करणे हेच कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत
या भूमीतून ऊर्जा घेत प्रत्येकाने पक्षवाढीसाठी काम करणे आवश्यक आहे. गद्दारी करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर दिले जाईल. आगामी काळात अशा प्रवृत्तींचा पराभव करून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यासोबत राहून शेकापचा लाल बावटा अभिमानाने फडकत ठेवू, असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
घोषणांनी दुमदुमला पेझारी परिसर
‘लाल बावटे की जय', ‘जयंतभाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा गगनभेदी घोषणांनी पेझारी नाका परिसर दणाणून गेला. रस्त्यांच्या दुतर्फा शेकापचे झेंडे फडकत असल्याने संपूर्ण परिसर लाल बावटेमय झाला होता. कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि एकजूट स्पष्टपणे जाणवत होती.








