। मुंबई । प्रतिनिधी ।
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता राजकीय वातावरण तापू लागले असून, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), शिवसेना, मनसे, काँग्रेससह विविध पक्ष व संघटना 15 मे रोजी मुंबईत होणाऱ्या धडक मोर्चात सहभागी होणार आहेत. गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, “गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून मदतीची मागणी करत आहे. मात्र, सरकारने हेक्टरी केवळ 22 हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. सरकारला गुडघे टेकायला भाग पाडण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा दिला.
दरम्यान, 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता गिरगाव चौपाटी येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, तो मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडकणार आहे. या आंदोलनात शिवसेना, मनसे, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर, माकप, धर्मराज्य पक्ष तसेच विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला दीपक पवार, प्रभाकर नारकर, राजन राजे, राजेंद्र कोरडे, कुणाल माईनकर, अरमाईटी इराणी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.







