हवामान खात्याचा इशारा; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 20) अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, सकाळपासूनच काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने व्यक्त केला आहे. वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी दुसरीकडे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. काहीजण नारळपाणी, कोकम सरबत तसेच विविध थंड पेयांचा आधार घेत आहेत. घसा कोरडा पडू नये आणि उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी थंड पेयांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, अनेक शेतकरी पावसाळ्यापूर्व तयारीत व्यस्त आहेत. त्याचबरोबर रायगडमधील प्रसिद्ध हापूस आंबा यंदा उशिराने बाजारात दाखल झाला असून, काही भागांमध्ये अजूनही आंबा काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत बुधवारी पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, दुसरीकडे कडक उन्हामुळे आधीच आंब्याचे नुकसान होत असताना, आता पाऊस पडल्यास आंब्यावर डाग पडण्याची आणि फळांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
विशेषतः आंबा, काजू तसेच काढणीस आलेल्या इतर पिकांवर या अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 22 मेपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तविली आहे.







