उन्हाळ्यात 64 टँकरवर जिल्ह्याची तहान भागवण्याची वेळ
| अलिबाग | प्रतिनिधी |
‘टँकरमुक्त रायगड’चे दावे करणाऱ्या प्रशासनाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, उन्हाळा तीव्र होताच जिल्ह्यातील हजारो नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील 64 गावे आणि 230 वाड्यांमधील तब्बल 1 लाख 13 हजार 709 नागरिकांना सध्या 64 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले होते. मात्र, रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही टँकरची गरज भासत असल्याने जलजीवन योजना प्रत्यक्षात कितपत यशस्वी झाली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्वाधिक गंभीर परिस्थिती पेण तालुक्यात असून, येथे 9 गावे आणि 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 765 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. महाड तालुक्यात 14 गावे आणि 87 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 22 हजार 243 नागरिकांना पाणी दिले जात आहे. पनवेल तालुक्यात 10 गावे आणि 8 वाड्यांसाठी 9 टँकर सुरू असून, 18 हजार 553 नागरिक त्यावर अवलंबून आहेत. कर्जतमध्ये 3 गावे व 11 वाड्यांसाठी 8 टँकर, तर खालापुरात 5 गावे व 9 वाड्यांसाठी 6 टँकर कार्यरत आहेत. माणगावमध्ये 4 गावे व 15 वाड्यांसाठी 5 टँकर सुरू आहेत. याशिवाय अलिबागमध्ये 4 गावे, उरणमध्ये 4 वाड्या, सुधागड-पाली तालुक्यात 2 वाड्या, रोहा तालुक्यात 3 गावे, पोलादपूर तालुक्यात 5 गावे व 14 वाड्या, म्हसळा तालुक्यात 6 गावे व 1 वाडी, तसेच श्रीवर्धन तालुक्यात 1 गाव व 3 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात टँकरची संख्या वाढत असताना दीर्घकालीन जलस्रोत निर्मिती, पाणी साठवण आणि जलव्यवस्थापनाच्या योजनांवर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेची कामे अपूर्ण असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवून असल्याचा दावा केला जात असला, तरी ‘टँकरमुक्त जिल्हा’ करण्याच्या घोषणा प्रत्यक्षात फोल ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.




