उरणच्या बोरी स्मशानभूमीत मानवी अवशेषांची विटंबना; प्रशासनाविरोधात संताप
| चिरनेर | प्रतिनिधी |
माणूस मेल्यानंतर तरी त्याला सन्मान आणि शांती मिळावी, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र, उरण शहरातील बोरी स्मशानभूमीतील धक्कादायक वास्तव पाहता ही अपेक्षाही आता धुळीस मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. स्मशानभूमीत ना कायमस्वरूपी वॉचमन, ना नियमित स्वच्छता, तर भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असल्याने मानवी अवशेषांची विटंबना होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे उरणमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमी परिसरात उघड्यावर पडलेल्या मानवी अवशेषांवर भटक्या कुत्र्यांनी ताव मारल्याचे प्रकार समोर आले आहेत. या घटनेची छायाचित्रे पाहून अनेकांच्या भावना तीव्र झाल्या असून, मृतांच्या सन्मानाशी संबंधित प्रश्नावर प्रशासनाचे दुर्लक्ष अक्षम्य असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत गटनेते अतुल ठाकूर आणि नगरसेविका प्रमिला पवार यांनी हा गंभीर विषय सभागृहात मांडला. स्मशानभूमीतील दुरवस्था, अपुरी व्यवस्था आणि मृतांच्या सन्मानाशी होत असलेली तडजोड याकडे त्यांनी लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व सदस्यांनी सामाजिक भान ठेवून या प्रश्नाकडे पाहावे, असे आवाहन केले. मात्र, या चर्चेदरम्यान काही नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतल्याची चर्चा शहरात रंगली असून, मृतांच्या सन्मानाशी संबंधित विषयावरही राजकारण होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उरणकरांचा संतप्त सवाल
स्मशानभूमीत कायमस्वरूपी वॉचमन का नाही? नियमित स्वच्छतेची व्यवस्था का केली जात नाही? भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी का ठरत आहे? मृतांच्या सन्मानाशी निगडित प्रश्नावरही दुर्लक्ष का केले जात आहे? नागरिकांनी स्मशानभूमीत तातडीने वॉचमनची नेमणूक, नियमित स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि सुरक्षित अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एक कोटींची वायू शवदाहिनी धूळ खात
बोरी स्मशानभूमीत तब्बल एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला अत्याधुनिक वायू शवदाहिनी प्रकल्प गेली दोन वर्षे बंद अवस्थेत पडून असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृतांच्या सन्मानाशी निगडित असलेल्या या संवेदनशील प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष उरणकरांच्या जिव्हारी लागले आहे.







