| पनवेल | प्रतिनिधी |
मे महिना संपताच पावसाळ्याची चाहूल लागली असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने कळंबोली परिसरात आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. कळंबोली वसाहतीतील अनेक भाग सखल असल्याने दरवर्षी मुसळधार पावसात रस्ते आणि परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागतो.
यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने आगाऊ नियोजन करत विविध ठिकाणी पाणी उपसा पंप बसविले आहेत. पावसाचे पाणी वेगाने बाहेर काढण्यासाठी या पंपांची चाचणीही घेण्यात आली आहे. तसेच सिडकोकडून उभारण्यात आलेले पाँड्स (जलसाठे) देखील कार्यान्वित ठेवण्यात आले असून, अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे.
नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात आली असून पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मनपा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा व्हावा यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कलंबोलीकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






