पर्यावरण संतुलनासाठी महत्व अबाधित; मानवी प्रदूषणामुळे प्रजननावर गंभीर परिणाम
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
मानवाने नद्यांमध्ये केलेले प्रदूषण, वाढते नागरीकरण आणि नैसर्गिक अधिवासावर झालेली अतिक्रमणे या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत रायगड जिल्ह्यातील नद्यांमध्ये पाणमांजरांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अतिशय लाजाळू स्वभावाच्या असलेल्या या जलचरांचे रायगड जिल्ह्यातील काळ, सावित्री, कुंडलिका, अंबा आणि उल्हास इत्यादी सर्वच प्रमुख नद्यांमध्ये आजही अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे ही निसर्गप्रेमींसाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे. अनेकदा मच्छिमार तसेच स्थानिकांना या प्राण्याचे अचानक दर्शन घडते. त्याला पाहून काहीजण अचंबित देखील होतात. बऱ्याचदा पाणमांजर मच्छीमारांच्या जाळ्यामधून मच्छी नेतात. तर, कधी जाळी देखील तोडतात.
माणगाव येथील काळ नदीमध्ये पाणमांजरांच्या काही विलोभनीय हालचाली प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. तसेच, या पाणमांजरांवर शंतनू कुवेसकर यांचा गेली 12 वर्षे अभ्यास सुरू आहे. या प्रदीर्घ अभ्यासामुळेच पाणमांजरांच्या सवयी, त्यांचे अन्न शोधण्याचे तंत्र आणि त्यांच्या अनेक अज्ञात हालचालींचा उलगडा करण्यात त्यांना यश आले आहे. पाणमांजरांचे जीवन आणि त्यांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने त्यांनी 2019 साली एक माहितीपूर्ण लघुपट देखील तयार केला आहे. हा लघुपट त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असून, त्या माध्यमातून पाणमांजरांच्या संवर्धनासाठी मोठी जनजागृती होत आहे. नद्यांमधील अन्नसाखळी संतुलित ठेवण्यात या प्राण्याचा किती मोठा वाटा आहे, हे या लघुपटातून प्रकर्षाने समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील नद्यांमध्ये वाढणारे रासायनिक सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा यांमुळे पाणमांजरांच्या प्रजननावर गंभीर परिणाम होत आहे. नदीकाठची जंगले नष्ट झाल्यामुळे या प्राण्यांना लपण्यासाठी आणि विणीसाठी सुरक्षित जागा मिळेनाशी झाली आहे. तसेच, नदीतील माशांचे प्रमाण घटल्यामुळे त्यांच्या खाद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नदीच्या शुद्धतेचा दर्शक!
पर्यावरण शास्त्रात पाणमांजर हा नदीच्या आरोग्याचा दर्शक मानला जातो. जर नद्यांमध्ये पाणमांजरे सुदृढ अवस्थेत असतील, तर ती नदी आणि तिची परिसंस्था जिवंत व शुद्ध आहे असे समजतात. त्यामुळे या लाजाळू जलचराचे रक्षण करणे ही केवळ पर्यावरणवाद्यांचीच नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
केवळ चर्चा न करता, रायगडच्या या जीवनवाहिन्या असलेल्या नद्या प्रदूषणमुक्त करणे गरजेचे आहे. पाणमांजरांचा अधिवास संरक्षित झाला पाहिजे. याबरोबरच स्थानिक नागरिक, मच्छिमार आणि प्रशासनाने एकत्र येऊन या दुर्मिळ प्राण्याला अभय दिले, तरच रायगडच्या नद्यांचे हे वैभव पुढील पिढ्यांना पाहायला मिळेल.
शंतनू कुवेसकर,
वन्यजीव अभ्यासक







