15 जूनपर्यंत पेरणीयोग्य पावसाची शक्यता कमी
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात मान्सूनने दक्षिण कोकणात हजेरी लावली असली तरी त्याची प्रगती अद्याप संथ आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यभर पावसाचा जोर कमी राहण्याची तसेच मान्सूनची वाटचाल मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. 15 जूननंतरच बहुतांश भागांत पेरणीयोग्य पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई करू नये, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील काही दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जना आणि वादळी पावसाच्या विखुरलेल्या सरी पडू शकतात. मात्र, हा पाऊस व्यापक स्वरूपाचा नसल्याने खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा चटका कायम राहणार असून, किमान 12 जूनपर्यंत कमाल तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नाही. विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे, तर मराठवाड्यात ते 35 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांजवळ थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मान्सूनच्या संथ प्रगतीमुळे आणि पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेमुळे राज्यातील बळीराजाची चिंता मात्र वाढली आहे.






