जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची ग्वाही
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा रायगड भूषण पुरस्कार यापुढे कोणत्याही परिस्थितीत खैरात स्वरूपात वाटला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दिली आहे. अलिबाग येथे झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केल्याने आगामी काळात रायगड भूषण पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायगड भूषण हा जिल्हा परिषदेचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आणि उत्तुंग कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. समाजकारण, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्र तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यासाठी दरवर्षी प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून रायगड भूषणसह जिल्हा परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुरस्कारांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्यांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा कमी होत असल्याची टीका विविध स्तरांतून होत होती. विशेषतः निवडणुका जवळ आल्या की पुरस्कारांची मोठ्या प्रमाणावर घोषणा केली जाते, अशी चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नेहमीच रंगत आली आहे.
काही वर्षांत दीडशे ते अडीचशेहून अधिक जणांची रायगड भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने गुणवंतांचा सन्मान राहिला आहे की केवळ पुरस्कार वितरणाचा सोहळा बनला आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. विशेष म्हणजे, पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींची यादी अनेकदा कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापर्यंत जाहीर होत नसल्याने निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित होत होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी अलिबागमधील कार्यक्रमात पुरस्कारांच्या खैरातीला आळा घालण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. “रायगड भूषण पुरस्काराची खैरात होणार नाही,“ असे त्यांनी ठामपणे सांगितल्याने पुरस्कारांची संख्या कमी करून गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेला प्राधान्य दिले जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
रायगड भूषण पुरस्कार हा जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या सन्मानांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या पुरस्काराचा दर्जा आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी कठोर व पारदर्शक निकष आवश्यक असल्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर आता प्रत्यक्षात निवड प्रक्रियेत कितपत बदल होतात आणि पुरस्कारांचे वाढते संख्याबळ रोखले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिष्ठेचा पुरस्कार; पण निवड प्रक्रियेवर कायम प्रश्नचिन्ह
रायगड भूषण पुरस्कार हा जिल्ह्यातील मानाचा पुरस्कार मानला जात असला तरी गेल्या काही वर्षांत पुरस्कारांची वाढती संख्या आणि निवड प्रक्रियेतील अपारदर्शकतेवर सातत्याने टीका होत आली आहे. अनेकदा पुरस्कारार्थींची यादी कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापर्यंत जाहीर होत नसल्याने निवडीचे निकष आणि प्रक्रिया याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.






