गुरचरण क्षेत्रात 750 रोपांची लागवड
। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
गावातील एकोप्याचे उत्तम दर्शन घडवत चरफळवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.23) गावाच्या गुरचरण क्षेत्रात 750 रोपे लावून वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम यशस्वी केला. गावात कार्यरत असलेल्या दी प्राइड इंडिया या संस्थेने मे महिन्यात ही 750 रोपे गावकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी या रोपांचे जून अखेरपर्यंत काळजीपूर्वक जतन केले. 22 जून रोजी पावसाला सुरुवात होताच, 23 जून रोजी गावातील प्रत्येक घरातील एका सदस्याच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमात फळझाडे व फुलझाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे फायदे पुढच्या पिढीला व्हावेत आणि गावातील मुलांना ताजी फळे-फुले मिळावीत, हा यामागचा मुख्य हेतू आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्यक आहे, ही जाणीव गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.गावाचा एकोपा सांभाळून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष जानू बांगारे, वसंत बांगारे, दामोदर निरगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रत्येक वाडी-गावात सर्वजण एकोप्याने राहिले, विचार चांगले ठेवले तर गावाची बरीचशी कामे सहज होतात. गुरचरणामध्ये लावलेल्या झाडांमुळे गाव समृद्ध होईल. असेच उपक्रम प्रत्येक गावात राबवावेत, असे आवाहन चेरफळवाडीचे प्राथमिक शिक्षक राजू बांगारे यांनी केले. चरफळवाडीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







