कशेडी व आंबेनळी घाटातील निर्बंध कायम
| पोलादपूर | प्रतिनिधी |
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने कशेडी आणि आंबेनळी घाटातील वाहतुकीवर घातलेल्या निर्बंधांचा सर्वाधिक फटका पोलादपूर तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. घाटरस्ते बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दररोज किलोमीटरच्या किलोमीटर पायपीट करावी लागत असून, खासगी वाहनांचे वाढीव भाडेही त्यांच्या पालकांच्या खिशाला परवडेनासे झाले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनच खडतर बनले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर जुन्या कशेडी घाटातील डेंजर झोन आणि तडे गेलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे एप्रिल 2026 पासून वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. सुरुवातीला महिनाभरासाठी लागू करण्यात आलेले हे निर्बंध प्रत्यक्षात आजतागायत कायम असल्याने भोगाव, येलंगेवाडी, कशेडी बंगला, पळचिल, खडकवणे, गोलदरा आणि तामसडेवाडी परिसरातील विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आयटीआय आणि महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कोंढवी फाट्यापर्यंत पायी जावे लागते. त्यानंतर खासगी वाहने किंवा एसटीने पुढील प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि पैशांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.
दरम्यान, आंबेनळी घाटातील रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर घाटबंदी 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आड, चांभारगणी, निवे, किनेश्वर, पायटे, कापडे खुर्द आणि कुंभळवणे येथील विद्यार्थ्यांनाही कापडे बुद्रुक येथील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचण्यासाठी पायपीट किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
विशेष म्हणजे, संबंधित ठेकेदार कंपनीने कशेडी घाटातून एसटी वाहतूक सुरू करण्याइतका रस्ता सुरक्षित असल्याचे सांगितले असले, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत अधिकृत परवानगी न मिळाल्याने एसटी सेवा अद्याप सुरू झालेली नाही.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कशेडी व आंबेनळी घाटमार्गावर स्थानिक पातळीवर एसटी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी अजय सलागरे यांनीही खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्याची माहिती मिळाली आहे.







