शेकापची सरकारकडे मागणी
आ.जयंत पाटील यांना निवेदन सादर
नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मधील अनधिकृत झोपडपट्टी अधिकृत करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाने राज्य सरकारकडे केलेली आहे.यासाठी शेकाप आ.जयंत पाटील यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले असून,त्यांनीही विधीमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित केला जाईल,अशी ग्वाही दिलेली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शाफिक शेख आणि सह चिटणीस उमेश कदम यांनी आ. जयंत पाटील यांची भेट घेतली आणि माथेरान मधील झोपडपट्टीचा विषय त्यांच्या कानावर घातला. 1985 पासून अनधिकृतचा शिक्का असलेल्या माथेरान मधील 174 परिवारांना हक्कचे घर मिळायला पाहिजे अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष सातत्याने करीत आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार जानेवारी 1995 प्रयत्न महाराष्ट्र राज्यातील मुंबई आणि उपनगर वगळता सर्व जिल्ह्यामध्ये अनधिकृत झोपड्या ह्या अधिकृत झाल्या आहेत.ह्याच धर्तीवर माथेरान मधील अनधिकृत झोपड्या अधिकृत कराव्या अशी मागणीचे पत्र स्थानिक शेतकारी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे, अशी माहिती माथेरान शेकापचे चिटणीस शफिक शेख यांनी आमदार जयंत पाटील यांना दिली आहे. याबाबत आमदार जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत माथेरान मधील जनतेसाठी आपण हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्याचा शब्द दिला आहे.
रायगडचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब राऊत तत्कालीन आमदार सुमंतराव राऊत, ज्येष्ठ नेते अॅड.दत्ता पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील, माजी खा.दि.बा.पाटील यांच्या कार्यकाळात माथेरानचा विकास झपाट्याने होत गेला.त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आमदार जयंत पाटील यांनी माथेरान कडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे माथेरान मधील सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीचा विषय अधिकृत करण्यासाठी माथेरान शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लेखी पत्राद्वारे आमदार जयंत पाटील यांना साकडे घालण्यात आले.







