वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील विविध वंचित वाड्या-वस्त्यांमध्ये आजही मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीच्या पेण तालुका शाखेच्या वतीने रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनील प्रल्हाद धामणकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वंचित समाज वास्तव्यास असून अनेक वर्षांपासून ते रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, लाईट, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी, आरोग्य सुविधा अशा अत्यावश्यक नागरी सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व मूलभूत सुविधांची कामे रायगड जिल्हा परिषदेमार्फत समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सामाजिक न्यायाच्या भावनेतून या मागणीचा सकारात्मक विचार करून पेण तालुक्यातील वंचित बांधवांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सुनील धामणकर यांनी सांगितले की, रायगड जिल्हयाचा विचार करता अनेक वाडया वस्त्या वंचित बहुतन बांधवांच्या आहेत त्यांना मुलभूत सुविधा मिळणे हे त्यांचे हक्क आहे त्यामुळे हे जिल्हा परिषदेने द्यावे अशी आम्ही मागणी केली आहे मागणीचा सकारात्मक विचार केला नाही तर आम्हाला आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल.






