। मुंबई । वृत्तसंस्था ।
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम (आयपीएल 2022) मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, खेळाडूंचा मेगा लिलाव 12 व 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे आयोजित केला गेला आहे. या लिलावात सर्व संघ आपल्या संघाची बांधणी करतील. त्याचवेळी, 2016 आयपीएल विजेता संघ सनरायझर्स हैदराबाद संघाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी हंगामासाठी त्यांनी आपली जर्सी प्रसिद्ध केली आहे. आपल्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी ही माहिती दिली.
आयपीएलच्या प्रमुख संघांपैकी एक असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2022 साठी आपली अधिकृत जर्सी लॉन्च केली. तब्बल सहा वर्षानंतर त्यांनी आपल्या जर्सीमध्ये महत्त्वाचा बदल केला. ऑरेंज आर्मी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने यावेळी आपल्या जर्सीमधून सोनेरी रंग पूर्णपणे हटविला आहे. यावेळी त्यांची जर्सी ही केशरी व काळ्या रंगाची असेल. तर, ट्राऊजर पूर्णपणे केसरी रंगाचा दिला आहे. याबरोबर संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठा बदल झाला आहे. टॉम मूडी मुख्य प्रशिक्षकपदी कायम असून, मुथय्या मुरलीधरन देखील गोलंदाजी सल्लगाराच्या स्वरूपात संघाचा आणखी एक हंगाम भाग असेल. याव्यतिरिक्त ब्रायन लारा, डेल स्टेन व हेमांग बदानी बदानी संघाला यावेळी मार्गदर्शन करताना दिसून येतील.