। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये 7 फेब्रुवारीला सिलहट सनरायजर्सचा खुलना टायगर्स विरुद्ध सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाचा अष्टपैलू रवी बोपाराला चेंडू छेडछाड प्रकरणात सामना फीच्या 75 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या चुकीचा फटका सिलहट सनरायझर्सलाही बसला आहे. त्यांना विरोधी संघाला पाच धावा पेनल्टी म्हणून द्याव्या लागल्या. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. खुलना टायगर्स विरुद्धच्या सामन्यात सिलहट सनरायझर्सचे नेतृत्व करणार्या बोपाराच्या खात्यात तीन डिमेरिट्स गुणांची नोंद झाली आहे.
सामन्याच्या 9 व्या षटकात घडलेला हा प्रकार आहे. कर्णधार बोपारा कॅमेरामध्ये गोलंदाजी करण्यापूर्वी चेंडूवर नखे लावताना दिसला आहे. सामना अधिकारी देबब्रत पाल यांनी बोपारावर सुरुवातीला तीन सामन्यांची बंदी घातली होती. अंतिम निर्णय बिपीएल स्पर्धेची तांत्रिक समिती म्हणजे एएसएम रोकीबुल हसन हे घेणार होते. बोपाराच्या अपीलानंतर तांत्रिक समितीने त्याला कमी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यामध्ये मैदानावरील पंच महफुजुर रहमान आणि प्रगीत रामबुकवेला यांना ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी त्याच्याकडून चेंडू काढून घेतला. बोपारा आणि यष्टिरक्षक अनामूल हक या दोघांनी पंचांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सिलहट सनरायझर्सला पाच धावांचा दंड ठोठावण्यात आला.