| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमधील प्रवासी टॅक्सीचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना गाडी चालविणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्र नसताना गाडी चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे, अशी प्रकरणे समोर आल्याने ही कारवाई केली आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून, येथे येणार्या पर्यटकांसाठी टॅक्सी चालक मालक संघटना सेवा देत असते. यातील काही टॅक्सी चालक विनापरवाना गाडी चालवतात, कागदपत्र नसताना गाडी चालवतात. अशा तक्रारी येत असल्यामुळे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस टॅक्सी स्टँड म्हणजे दस्तुरी येथे तपासणी सुरू केली. यामध्ये विना परवाना गाडी चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक आणणे, असे प्रत्यक्षात पाहणीदरम्यान आढळले. त्या टॅक्सी चालकांवर कारवाई केली. एकूण 13 टॅक्सी चालकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली.
या तपासणी करण्यासाठी पोलीस हवालदार अरविंद ठाकूर, महेंद्र राठोड, पोलीस नाईक अशोक गर्जे, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, दामोदर खतेले यांनी केली. या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी सांगितले की टॅक्सी चालकांबाबत वारंवार तोंडी तक्रारी येत होत्या, त्यामुळे तपासणी करण्यात आली त्यात नियम मोडणार्या प्रवासी टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली. या गाड्या पर्यटक प्रवासी ने-आण करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रत्येक गाडीला इन्शुरन्स असणे महत्त्वाचे आहे. यापुढे जर गाडीला इन्शुरन्स नसेल, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लव्हे यांनी दिला. तर, आताच आम्ही लॉकडाऊनच्या आर्थिक चक्रातून सावरत आहोत. कोव्हिडमुळे आमची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. आता पर्यटन सुरू झालंय. त्यामुळे पर्यटकाना चांगली सेवा निश्चित देऊ, असे टॅक्सी चालकांकडून सांगण्यात आले.