| शिरढोण | प्रतिनिधी |
शिरढोण ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच वैशाली ॠषिकेश भोईर यांनी सोमवारी (दि.26) पदभार स्विकारला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती स्मारकामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी येत्या काळात गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार ग्रामस्थांच्या उपस्थितीत केला.
कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच वैशाली भोईर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच वैशाली भोईर यांनी आपला पदभार स्वीकारला.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यभूमीमध्ये सरपंच पदी निवडून आले, याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजते. माझ्यावर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकणार्या सर्व मतदारांचे आभार. येत्या पाच वर्षात शिरढोण गावाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही सरपंच वैशाली ॠषिकेश भोईक यांनी दिली.
तर शिरढोण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जावू न देता नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास केला जाईल. सरकारकडून निधी मंजूर करून ग्रामस्थांसाठी विविध योजना राबवण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी जि.प.सदस्य राम भोईर यांनी दिली.