| अलिबाग | प्रतिनिधी |
लायन्स क्लब अलिबाग आयोजित कराओके आयडॉल स्पर्धेच्या प्राथमिक निवड फेरीचा आलिबाग मधील सिंगिंग स्टार्स क्लब मध्ये हौशी गायक कलाकारांच्या प्रचंड प्रतिसादात शुभारंभ झाला. लायन्स क्लब अलिबाग तर्फे हौशी व व्यावसायिक गायक कलाकारांसाठी कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी झालेल्या प्राथमिक फेरीतील निवडक गायकांची जाहीर महाअंतिम फेरी लायन्स फेस्टिवल 2023 च्या भव्य मंचावर 25 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन बोराडे दाम्पत्य संचालित सिंगींग स्टार्स क्लब या सुप्रसिद्ध कराओके क्लबमध्ये लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन लायन महेश मोघे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाले. लायन प्रियदर्शनी पाटील यांनी गायलेल्या गणेश स्तवनाने स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि अलिबाग परिसरातील हौशी गायक कलाकारांनी परिक्षकांसमोर आपले नशीब अजमावत सुरेल गाणी सादर केली. उद्घाटन प्रसंगी लायन नयन कवळे आणि लायन अनिल म्हात्रे स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून महा अंतिम फेरीत गुणवान गायकांचा जोरदार मुकाबला होईल असे स्पर्धा समन्वयक संजय मोरणकर यांनी कळविले आहे.