अधिकारी, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन कारभार
। पाली-वाघोशी। वार्ताहर ।
पाली पंचायत समितीच्या कार्यलयाची मागील काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयाच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले असून, काही ठिकाणी काँक्रिट निखळून खाली पडले आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून येथील कर्मचारी व कामासाठी येणार्या नागरिकांना राहावे लागत आहे.
पाली खोपोली मार्गालगतच पंचायत समितीचे मुख्य कार्यालय आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, ग्रामीण रोजगार इतर कार्यालय आहेत, तर गटविकास अधिकारी यांचे कार्यालय शेजारी आहे. त्यातून विविध क्षेत्रातील कामकाज चालते. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी या कार्यलयात येत असतात. परंतु, सध्या पंचायत समितीच्या कार्यालय हे धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
इमारत उभारून अनेक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. इमारतीत असलेल्या अनेक ठिकाणच्या विभागातील कार्यालयांच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंतीवरील प्लास्टर ही निखळून खाली पडले आहे. स्लॅब कोसळून खाली पडल्याने त्यातील सळ्या सुद्धा आता बाहेर दिसू लागल्या आहेत. जसजसे बांधकाम जुने होत आहे तशी ही इमारत अधिकच धोकादायक बनू लागली आहे.
पंचायत समिती कार्यालयाची झालेली दुरवस्था हा चिंतेचा विषय असून, आम्ही लवकरच पंचायत समिती सेस फंडामधून निधी उपलब्ध करून दुरूस्ती अथवा नव्याने बांधकाम करणार आहोत.
अशोक महामुणी
गटविकास अधिकारी, सुधागड पाली
प्रशासकीय कार्यालयीची झालेली अवस्था ही दयनीय आहे. उद्या जर या कार्यलयात स्लॅब कोसळून कोणाला दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण? हे कार्यालय नव्याने व्हावे याकरिता आम्ही आंदोलन करणार आहोत.
प्रशांत गायकवाड
युवक सचिव, वंचित बहुजन आघाडी