| दिघी | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दिवेआगर पर्यटन स्थळाबरोबर येथील मदगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव पुढे यावे यासाठी या वनदुर्गकडे जाण्याचा रस्ता मंजूर झाला. मात्र, मंजूर रस्ता वनविभागाच्या जागेच्या हस्तांतरणाअभावी पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पर्यटन विकासाबरोबर शिवप्रेमींची इतिहासाकडे जाणारी वाट थांबली आहे. तालुक्यातील बोर्लीपंचतन असलेले वांजळे या लहानशा गावाजवळील मदगड हे शिवकालीन आहे. आजूबाजूचा नयनरम्य असे हिरवेगार डोंगर, यातून वळण घेत उंच गड किल्ल्याकडे जाणारा रस्ता सर्व काही निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवत होणारा प्रवास पर्यटकांच्या व दुर्गप्रेमींच्या पसंतीचा आहे. मात्र, पुढे किल्ल्यावर जाणार्या रस्त्यावर झाडाझुडुपांचा अडथळा होत असल्याने सुस्थितीत रस्त्याची मागणी करण्यात आली.
श्रीवर्धनमधील ठिकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय असून, त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. याच उद्देशाने किल्ल्याकडे जाणार्या रस्त्याच्या मागणीनुसार कोकण पर्यटन ग्रामीण विकास या योजनेंतर्गत 600 मीटर अंतरातील रस्त्याला मंजुरी मिळाली. अंदाजे 15 लाख निधीच्या तरतुदीनुसार मागील वर्षात रस्त्याचे कामदेखील सुरू झाले. मात्र, पर्यटनवाढीसाठी चालना मिळून हाताना रोजगार संधी असतानाच वनखात्याकडून वनजमीन देण्याची प्रक्रिया रखडल्याने रस्त्याचे कामच बंद आहे.
चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो. या किल्ल्यावर जाणार्या रस्त्याचे काम हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत आहे. यामधील वन विभागाच्या जमिनीचे अधिग्रहण होणे अद्यापही बाकी आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याबाबतचा प्रस्ताव हा वन पाठवला आहे. मात्र, शासकीय रितीरिवाजामुळे नेहमीप्रमाणे काम होण्यास विलंब होत असल्याने येथील इतिहासाविषयी उत्सुकता व जागरुकता असलेल्या शिवप्रेमींची वाट थांबली आहे.
मदगडावरील जाणार्या मार्गवार वन विभागाच्या जमिनीचे अधिग्रहण होणे अद्यापही बाकी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वन खात्याकडे पाठवला आहे. त्यामुळे परवानगी प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू होईल. – प्रवीण उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, श्रीवर्धन
पर्यटन हे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे मदगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बनल्यानंतर ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा होईल. पुढे जनजागृती होऊन किल्ल्याचा इतिहास प्रकाशात येईल. भविष्यात पर्यटन विकासाबरोबर आम्हा स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल. – बाळकृष्ण गायकर, वांजळे, रहिवासी